विषारी दारूकांडाचे मृत्युतांडव सुरूच! मृतांचा आकडा २२ वर; १३ अधिकारी निलंबित..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस..
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचे मृत्युतांडव थांबण्याची चिन्हे दिसत नसून शनिवारी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. फुगेवाडीतील दोघांसह हडपसरमधील ससाणेनगर येथील एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतांमध्ये राजेंद्र टप्पे (वय ३६, रा. फुगेवाडी), महेंद्र ओवाळ (वय ५८, रा. दापोडी) आणि संजय लिंकन धैर्यम (वय ४९, रा. ससाणेनगर, हडपसर) यांचा समावेश आहे. तिघांचाही मृत्यू विषारी दारू प्राशनामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या नव्या मृत्यूंमुळे फुगेवाडीतील मृतांची संख्या १५ वर, तर हडपसर परिसरातील मृतांची संख्या ७ वर पोहोचली आहे. याशिवाय आठहून अधिक नागरिकांवर विविध रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा तपास वेगाने करण्यासाठी सीआयडीने दोन विशेष तपास पथके नियुक्त केली असून विषारी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मिथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापेमारी कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर विभागाने मोठी कारवाई करत १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे. अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात अपयश आणि कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि जवानांचा समावेश असून त्यांना निलंबन काळात कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
विषारी दारूकांडातील वाढता मृत्यूदर, प्रशासनाची कथित निष्क्रियता आणि अवैध दारू व्यवसायाचे वाढते जाळे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

