विश्वासघाताचा कळस! मालकावरच दरोडा टाकणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा…
मालकाच्या हालचालींची माहिती मिळवून त्याच्यावरच दरोडा टाकण्याचा कट रचणाऱ्या कर्मचाऱ्यासह त्याच्या साथीदारांना सहकारनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, आरोपींकडून भारतीय तसेच परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.
दिनांक २५ मे २०२६ रोजी दुर्वांकुर कार्यालयाजवळ, धनकवडी पोस्ट ऑफिस रोड, संभाजीनगर येथे ही घटना घडली होती. आर्या फॉरेक्स प्रा. लि., मार्केटयार्ड रोड, गुलटेकडी येथील कार्यालयासाठी जात असताना फिर्यादी यांच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर स्प्रे मारून दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या ताब्यातील २५ लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम व परकीय चलन असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली होती.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार करीत होते.
घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आंबेगाव पठार परिसरातून एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
तपासात उघड झाले की, फिर्यादी यांच्या कार्यालयात काम करणारा युवराज गणेश वैराट (वय २४) यानेच संपूर्ण कट रचला होता. त्याच्या सांगण्यावरून करण भगवान कोंढाळकर (१९), यश भगवान कोंढाळकर (२१), जुनेद जमिल शेख (१९), ऋतुराज शिवाजी गोरे (२१) तसेच एका विधिसंघर्षित बालकाने मिळून हा दरोडा घातला होता.
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून विधिसंघर्षित बालकास बाल न्याय मंडळ, येरवडा येथे हजर करण्यात आले आहे. आरोपींकडून २४ लाख ३० हजार रुपये भारतीय चलन आणि सुमारे ९० हजार रुपये किमतीचे परकीय चलन असा एकूण २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवतरे, सुतकर, भगत आणि सहकाऱ्यांनी पार पाडली.



