बुधवार पेठेतून ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात; वेश्याव्यवसाय व अवैध वास्तव्याचा पर्दाफाश


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

पुणे पोलिसांनी मध्यरात्री राबवलेल्या विशेष कोबिंग ऑपरेशनमध्ये बुधवार पेठेतील रेडलाईट परिसरातून सहा बांगलादेशी महिलांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या भारतात प्रवेश करून पुण्यात वास्तव्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईत उघडकीस आला आहे.

पोलीस उपआयुक्त श्री. कृपिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना व खडक पोलीस स्टेशनच्या पथकाने बुधवार पेठेतील सागर बिल्डिंग येथे छापा टाकला. रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या महिला बांगलादेशातून अवैधरित्या भारतात आल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलांना पश्चिम बंगालमार्गे एजंटच्या माध्यमातून पुण्यात आणण्यात आले होते. सुरुवातीला शिलाईकाम, ब्युटी पार्लर व घरकामाच्या नावाखाली त्यांना येथे आणण्यात आले, मात्र त्यानंतर त्या वेश्याव्यवसायात सहभागी झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे

Advertisement

या कारवाईत महिलांकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, पोलीस उपआयुक्त श्री. कृपिकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत सुमारे १०३ बांगलादेशी महिला व पुरुषांवर कारवाई करून त्यांना त्यांच्या देशात पाठविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सदर कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त श्री. प्रवीण दराडे, अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. फरासखाना व खडक पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही धडक मोहीम यशस्वी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!