कोंढवा पोलिसांची धडक कारवाई; बांधकाम व्यावसायिकांना खंडणी उकळणाऱ्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

कोंढवा परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना बेकायदेशीर बांधकामाची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे खंडणीखोरांवर प्रभावी आळा बसणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत कोंढवा खुर्द परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला वारंवार धमकावून महापालिकेकडे तक्रार करण्याची भीती दाखविण्यात आली. तसेच बांधकाम बंद पाडण्याची धमकी देत रोख रक्कम आणि बीएचके फ्लॅटची मागणी करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ३५१(२)(३) व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान संबंधित आरोपी संघटित पद्धतीने खंडणीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवाकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली MCOCA लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ अंतर्गत आरोपी शफी गुलजारखान पठाण आणि समीर शफी पठाण यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कारवाईत पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवाकर, सहाय्यक पोलिस आयुक्त रामदास इंगवले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस तसेच कोंढवा पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढविण्यासाठी कोंढवा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे परिसरात स्वागत होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!