पुण्यात अवैध धंदेवाल्यांवर पोलिसांचा प्रहार; ‘मिशन क्रॅकडाऊन’ची दमदार सुरुवात


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस..

पुणे शहरात अवैध धंद्यांचे वाढते जाळे, हातभट्टी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटना, गुटखा, मटका, जुगार, अमली पदार्थ आणि संघटित गुन्हेगारीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-7 चे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अभिनाश कुमार (भा.पो.से.) यांनी ‘मिशन क्रॅकडाऊन’ या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे.

मोहिमेअंतर्गत अवैध दारू विक्री, मटका-जुगार, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे, खंडणी, संघटित गुन्हेगारी तसेच समाजविघातक प्रवृत्तींविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी परिमंडळ-7 मध्ये दोन विशेष पथके स्थापन करण्यात आली असून गुप्त माहितीच्या आधारे नियमित धाडी व विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत.
१५ जुलै २०२६ रोजी लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवायांमध्ये पोलिसांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले.
पहिली कारवाई :-
मोझे आळी, लोहगाव येथील हॉटेल ब्ल्यू डायमंड येथे दुपारी १२.१५ वाजता छापा टाकून चालक हनुमंता शिवलिंगप्पा शिंदे (वय २२) याच्याकडून ₹७,९९० किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा व ₹२,००० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी हॉटेलचे मूळ मालक सुरज गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई :-
दुपारी १ वाजता हॉटेल राजरत्न येथे छापा टाकून चालक संकेत भारत घोडके (वय २८) याच्याकडून ₹४,००५ किमतीचा मद्यसाठा व ₹११,५३० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी हॉटेलचे मूळ मालक सुहास प्रविण मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसरी कारवाई :
दुपारी २ वाजता यशस्वी हॉटेलच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत भाऊसाहेब गोपीनाथ रागपसरे याच्यासह तीन मटका रायटर रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून ₹१०,८९० रोख रक्कम, कल्याण व मुंबई टाइम बाजाराचे मटका साहित्य, वापरलेली आठ व न वापरलेली अकरा पावती पुस्तके तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या सर्व कारवायांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये दोन गुन्हे आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोहगाव पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ कराड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ब्रेंडे, साबळे, इथापे तसेच पोलीस शिपाई पुंडे, चिंगे आणि सरतापे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांना आवाहन..

परिसरात अवैध दारू, मटका, जुगार, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे, खंडणी किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर धंद्याची माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
डीसीपी अभिनाश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गुन्हेगारांना कायद्याची भीती आणि नागरिकांना सुरक्षिततेची खात्री” हा ‘मिशन क्रॅकडाऊन’चा मूलमंत्र असून पुणे शहरा मध्ये अवैध धंदे आणि समाजकंटकांविरोधातील धडक कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहेत.

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!