पुणे महापालिका रणसंग्राम : प्रचाराचा आज पडदा, बंडखोरी-प्रतिष्ठेची लढाई शिगेला…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली असून प्रचाराचा जोरदार धडाका अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेले अनेक दिवस शहरातील प्रत्येक प्रभागात मेळावे, झंझावाती रॅली, कोपरा सभा आणि ध्वनीक्षेपकांचा गजर सुरू होता. मात्र, मंगळवार (दि. १३) सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचाराची तोफ थंडावणार असून, त्यानंतर पुणेकरांचा कौल ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
यंदाची पुणे महापालिका निवडणूक केवळ सत्तेची लढाई न राहता प्रतिष्ठा, बंडखोरी आणि बदललेल्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

१५ जानेवारीला मतदान, १,१४९ उमेदवार रिंगणात
येत्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून पुणे महापालिकेच्या १६३ नगरसेवक पदांसाठी (दोन बिनविरोध) निवडणूक होत आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल १ हजार १४९ उमेदवार मतदारांचा कौल मिळवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. युती-आघाड्यांचे राजकारण, गल्लीबोळात सत्तांतराचे प्रतिबिंब. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नव्या युती-आघाड्यांचा उदय. राज्यातील राजकीय स्थित्यंतरांचा थेट परिणाम पुण्याच्या प्रभागनिहाय राजकारणावर दिसून येत आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष मात्र पुणे महापालिकेत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत.

अजित पवारांचे पुण्यावर लक्ष…

Advertisement

राष्ट्रवादी एकत्र
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर विशेष लक्ष केंद्रीत करत पुण्यात तळ ठोकला आहे. यंदा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
भाजप स्वबळावर, विरोधकांची नवी आघाडी
भाजपने कोणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत जोरदार प्रचार केला आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येऊन मैदानात उतरले असून, ही नवी आघाडी मतदारांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरली आहे.

उमेदवारीवरून बंडखोरी, कार्यकर्त्यांचा उद्रेक…

सर्वच पक्षांत उमेदवारी वाटपावरून अंतर्गत धुसफूस उफाळून आली. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याचा आरोप उघडपणे करण्यात आला.
यामुळे अनेक प्रभागांत स्वकीय बंडखोरीचे आव्हान पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसमोर उभे राहिले असून, हीच बंडखोरी निकालात निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पळवापळवीने गणिते बदलली
निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी-विरोधी गटांमध्ये कार्यकर्त्यांची पळवापळवी शिगेला पोहोचली होती. वजनदार कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी चढाओढ लागल्याने प्रभागनिहाय गणिते पूर्णतः बदलली आहेत.
आता प्रचार थांबणार, पण राजकीय धडका मात्र मतदानाच्या दिवशी आणि निकालात उमटणार, हे निश्चित!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!