कधी नव्हे ते घडले! दोन महिन्यांत पुणे महापालिकेच्या तिजोरीत ७७३ कोटींचा पाऊस…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस, गणेश तुम्मा
इतिहास घडला! पुणे महापालिकेच्या ‘अभय योजने’त अवघ्या २ महिन्यांत ७७३.२५ कोटींची विक्रमी वसुली कर थकबाकीदारांना दिलेल्या ७५% शास्ती माफीचा जबरदस्त फायदा, १.२४ लाख मिळकतधारकांचा अभूतपूर्व प्रतिसाद…
पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अभय योजनेच्या कालावधीत उच्चांकी ७७३.२५ कोटी रुपयांची विक्रमी मिळकतकर वसुली झाल्याने पालिका प्रशासनात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत इतकी मोठी रक्कम मनपा तिजोरीत जमा होणे ही ऐतिहासिक बाब मानली जात आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीत निवासी, बिगरनिवासी तसेच मोकळ्या जागांवरील मिळकतकर वर्षानुवर्षे न भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर थकबाकी निर्माण झाली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, प्रकरण ८ नियम ४१ अन्वये थकबाकीदार मिळकतींवर दरमहा २ टक्के शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांवरील आर्थिक बोजा वाढत चालला होता.
या पार्श्वभूमीवर नागरिकांची वाढती थकबाकी लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘अभय योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत शास्ती व दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सूट देण्यात आली होती.
या सवलतीचा लाभ घेत सुमारे १.२४ लाख मिळकतधारकांनी तब्बल ७७३.२५ कोटी रुपयांचा मिळकतकर भरला. कर आकारणी व कर संकलन विभागाने विशेष मोहिमा राबवत उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे ही विक्रमी वसुली शक्य झाली.
विशेष म्हणजे, आजअखेर पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीत एकूण २५५७.९५ कोटी रुपये जमा झाले आहेत, तर गत आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२५ अखेर ही रक्कम २३४५.९० कोटी रुपये इतकी होती.
यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनांमध्ये सन २०२०-२१ मध्ये चार महिन्यांच्या कालावधीत ४८५.६७ कोटी रुपयांची सर्वाधिक वसुली झाली होती. मात्र, यंदाच्या केवळ दोन महिन्यांच्या अभय योजनेत तो विक्रम मोडीत निघत ७७३.२५ कोटींची ऐतिहासिक वसुली नोंदवली गेली आहे.
महापालिकेच्या आर्थिक बळकटीसाठी ‘अभय योजना’ ठरली गेमचेंजर, तर कर थकबाकीदारांसाठी ही सुवर्णसंधी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.



