पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘धडाकेबाज’ महापौर कोण?
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
पुणे शहरात वाहतूक, पाणीपुरवठा, प्रदूषण, स्मार्ट सिटी, रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेणारा, प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा महापौर कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुणे शहराचा कारभार हाकणारा पुढचा महापौर कोण असणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापौर निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार असून, त्याआधी येत्या २२ जानेवारी रोजी महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या सोडतीतून पुण्याचे महापौर पद महिलेसाठी की पुरुषासाठी, तसेच कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
आरक्षणाची अधिकृत घोषणा होण्याआधीच राजकीय हालचालींना वेग आला असून, पुण्यात सत्ताधारी भाजपमधील काही दिग्गज नेत्यांची नावं महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. आरक्षण ‘सोयीचं’ सुटलं, तर पक्षालाही या नावांचा गांभीर्याने विचार करावा लागणार, हे निश्चित मानलं जात आहे.
महापौरपदाच्या चर्चेत कोण?
भाजपकडून गणेश बिडकर, राजेंद्र शिळमकर आणि धीरज घाटे ही तीन नावं सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत.
गणेश बिडकर यांच्या नावाने तर निकालाआधीच शहरात बॅनरबाजी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
राजेंद्र शिळमकर हे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
तर धीरज घाटे, भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी सभागृह नेते, प्रशासन व संघटनात्मक अनुभवामुळे मजबूत दावेदार मानले जात आहेत.
२२ जानेवारीला निर्णायक दिवस…
नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ही सोडत नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यानंतर संबंधित महापालिकांचे आयुक्त महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करतील आणि पहिल्याच सभेत महापौर निवड होईल.
महत्त्वाचं म्हणजे, महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने ठरवले जाणार असून, २०११ च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण निश्चित होणार आहे. यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘धडाकेबाज’ महापौर कोण?
पुणे शहरात वाहतूक, पाणीपुरवठा, प्रदूषण, स्मार्ट सिटी, रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेणारा, प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा महापौर कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



