श्री साई मित्र मंडळाचा गणेशोत्सवातील कार्यकर्ता ते पुणे शहराचे प्रतिनिधित्व दिल्लीत खासदार म्हणून करणार ….
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
श्री साई मित्र मंडळाचा गणेशोत्सवातील कार्यकर्ता ,
कुस्तीपट्टू, भाजपचा बूथ स्तरापासून काम करत आलेला कार्यकर्ता अन् पुण्याचे माजी महापौर भूषविलेले मुरलीधर मोहोळ हे आता खासदार म्हणून संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मुरलीधर मोहोळ इयत्ता दुसरी पर्यंतचे शिक्षण मुठा गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर १०वी पर्यंतचे शिक्षण भाव हायस्कूल टिळक रस्ता येथे घेतले. याच काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले.
मुरलीधर मोहोळ हे उच्च शिक्षणासाठी कोल्हापूर येथे गेले. तेथे त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. तसेच कुस्तीची आवड असल्याने कोल्हापूर येथे आखाड्यात प्रशिक्षण घेतले. यावेळी त्यांनी विविध स्पर्धांपर्यत भाग घेतले. राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी चमक दाखवली.शिक्षण संपल्यानंतर पुन्हा पुण्यात आल्यानंतर श्री साई मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सवातील कार्यकर्ता म्हणून काम केले. त्याच वेळी भाजपचे काम करताना जय भवानीनगर, केळेवाडी या भागाचा बूथ प्रमुख म्हणून काम केले. २००२ला महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली. २००६ ला महापालिकेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाल्याने नगरसेवक होण्याची संधी मिळाली. त्यानंतर २००७ ते २०१२, २०१७ ते २०२२ असे तीन वेळा मोहोळ हे नगरसेवक झाले. २००९ ला त्यांनी खडकवासला विधानसभा निवडणूकही लढवली होती.
पुणे महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर मोहोळ हे स्थायी समिती अध्यक्ष झाले. त्यांनी दोन अर्थसंकल्प मांडले. त्यानंतर ते अडीच वर्ष पुण्याचे महापौरपद भूषविले. सध्या ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. पक्ष संघटनेसह लोकप्रतिनिधी म्हणून मोहोळ यांनी काम करत आता संसदेत पुणेकरांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.



