मुंढे पॅटर्न’चा धडाका! गुटखा माफियांना थेट इशारा; हॉटेल्स, रुग्णालये आणि भेसळखोरांवरही करडी नजर
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात धडाकेबाज कारवाईचा सपाटा लावला असून, अवघ्या ३० दिवसांत ९०४ ठिकाणी धाडी टाकून तब्बल ₹३४ कोटी ६६ लाख ९० हजार ६२४ किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून, संघटित गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी आता ‘मकोका’ (MCOCA) लागू करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.
केवळ गुटखा माफियांवरच नव्हे, तर सर्वसामान्य ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठीही एफडीएने कठोर भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये ग्राहकांना स्वच्छ व मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक करण्यात आले असून, ग्राहकांना सक्तीने मिनरल वॉटर विकण्याचा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही.
यासोबतच, रुग्णालयांनी रुग्णांना स्वतःच्या संलग्न मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परवानाधारक औषध दुकानातून औषधे खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दुग्धजन्य पदार्थ, मावा, खाद्यतेल आणि इतर अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स आणि नामांकित ब्रँड्सनाही अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्यास भाग पाडले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.
महाराष्ट्रातील आवडत्या इडली-डोशाच्या व वडापाव या खाद्य पदार्थच्या गुणवत्तेवरही आता एफडीएची विशेष नजर राहणार आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करत ४५७ जणांना अटक, ४२ वाहने जप्त करण्यात आली असून अनेक आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.
शिस्त, पारदर्शकता आणि कठोर अंमलबजावणी’ या त्रिसूत्रीवर आधारित ‘मुंढे पॅटर्न’ राज्यातील अन्नसुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

