आरक्षण वर्गीकरणाच्या वादात सलोख्याचा मार्ग; नवबौद्ध-मातंग समाजाचा संवादासाठी पुढाकार”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना समाजात मतभेद आणि कटुता वाढू नये, तसेच नवबौद्ध आणि मातंग समाजामध्ये संवाद व परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने पुण्यात “नवबौद्ध-मातंग सलोखा परिषद” आयोजित करण्यात आली.
गुरुवार, २५ जून रोजी बाळासाहेब ठाकरे कला दालन, पुणे येथे झालेल्या या परिषदेत फुले-शाहू-आंबेडकर आणि लोकशाही, सामाजिक न्याय व बंधुता या विचारांच्या अधिष्ठानावर दोन्ही समाजांमध्ये ऐक्याची भूमिका मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.
परिषदेला आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते वसंत साळवे, माजी आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते रोहिदास गायकवाड, आंबेडकरी अभ्यासक धम्मसंगिनी रमागोरख, विचारवंत व कवी कॉ. महादेव खुडे, मातंग समाजाचे कार्यकर्ते अनिल हतागळे यांनी मार्गदर्शन केले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे होते.
परिषदेत आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये बदर समितीचा अहवाल जाहीर करणे, उपवर्गीकरण प्रक्रियेत सर्व अनुसूचित जातींच्या प्रतिनिधी, अभ्यासक व संशोधकांचा समावेश करणे, जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरणाचा विचार करणे, तसेच राज्यभर अशा सलोखा परिषदांचे आयोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
याशिवाय फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करत समाजात द्वेषाऐवजी बंधुता, संवाद आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी राज्यव्यापी जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या परिषदेच्या आयोजनात सत्यशोधक बहुजन आघाडीचे अध्यक्ष सचिन बगाडे, नागेश भोसले, नागेश गायकवाड, ॲड. कपिल शिवशरण, राहुल सोनवणे, अरविंद पाटोळे आणि ॲड. आकाश साबळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
परिषदेत उपस्थितांनी आरक्षणाच्या प्रश्नावर मतभेद असू शकतात; मात्र ते लोकशाही, घटनात्मक आणि शांततापूर्ण संवादातून सोडविणे हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. समाजात संघर्षाऐवजी सलोखा, परस्पर सन्मान आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

