निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप; नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांच्या पदावर टांगती तलवार”


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३८ मधील भाजपचे नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांच्यावर अनधिकृत बांधकामांबाबत गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्या नगरसेवकपदावर संकटाचे ढग दाटले आहेत. उद्धवसेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी खोपडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभागात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य बांधकामे करण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित बांधकामांचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला नसल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना आपली मालमत्ता व संबंधित माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर करणे बंधनकारक असते. खोटी किंवा अपूर्ण माहिती दिल्यास Representation of the People Act, 1951 अंतर्गत कारावास व दंडाची तरतूद आहे.
मोरे यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, समाविष्ट गावांमधील नोकरभरती प्रकरणातही विभागीय आयुक्तांसमोरील चौकशीत खोपडे दोषी ठरल्याची नोंद आहे. त्यामुळे या सर्व बाबींची सखोल चौकशी करून नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (MRTP Act) अंतर्गत अनधिकृत बांधकाम हा दंडनीय गुन्हा असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच पाडकामाची प्रक्रिया राबवली जाऊ शकते. नागरिकांकडून या बांधकामांविरोधात वारंवार तक्रारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात निवडणूक आयोग तसेच न्यायालयीन स्तरावर पुढील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संबंधित प्रतिज्ञापत्राची सखोल पडताळणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!