महात्मा फुले वाड्यात वटपूजनाला हिरवा कंदील; जाचक बंदी अखेर हटली!”


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस..

पुण्यातील ऐतिहासिक गुरुवार पेठ येथील महात्मा फुले वाडा परिसरातील वटवृक्ष पूजनावर पुरातत्त्व विभागाने घातलेली बंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. स्थानिक महिला, हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी पुण्यातील काही पुरोगामी चळवळीतील नागरिक व कार्यकर्त्यांनी वटवृक्ष पूजनाला अंधश्रद्धेचे स्वरूप असल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने वटपूजनावर निर्बंध घातले होते. मात्र या निर्णयाविरोधात स्थानिक महिला, विविध हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांनी पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन तसेच पुणे महापालिका आयुक्तांकडे सातत्याने निवेदने देऊन बंदी तातडीने उठविण्याची मागणी केली होती.
महात्मा फुले वाडा हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित होण्यापूर्वीपासून या ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्ष पूजनाची परंपरा सुरू असल्याचे सांगत, त्या परंपरेला कोणताही खंड पडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था राखून शांततेत वटपूजन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्यसभा खासदार मेघा कुलकर्णी, स्थानिक महिला आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सातत्याने केली होती.
या मागणीची दखल घेत पुरातत्त्व विभागाने पारंपरिक चालीरितींना बाधा येऊ नये या भूमिकेतून वटपूजनास परवानगी दिली. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, हा लोकभावनेचा विजय असल्याची प्रतिक्रिया आंदोलनाचे समन्वयक विजय देवकुळे, गणेश तुम्मा आणि अविनाश देवकुळे यांनी व्यक्त केली.
या पाठपुराव्यात स्थानिक महिला मंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये यशांती धोंगडे, सुवर्णा देवकुळे, माधुरी बल्लाळ, राखी जाधव, मीना लोखंडे, नारायणी कांबळे, आरती साठे, प्रियंका मच्ची, अनुष्का नाईक, लता ससाणे, सीता वाळुंज, पपूजा पल्ला, भाग्यश्री चौगुले, अलका दामरे, अंजना परदेशी, कार्तिकी परदेशी, मीना उमणे, उज्ज्वला गोड, कांचन दोडे यांच्यासह अनेक महिलांनी सक्रिय सहभाग घेतला.

प्रतिक्रिया :
“महात्मा फुले यांच्या पर्यावरणपूरक आणि लोककल्याणकारी विचारांचा वारसा जपत वटवृक्षासारख्या पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हाच वटपूजनाचा खरा उद्देश आहे. पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर संगम असलेला हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
— अविनाश देवकुळे, स्थानिक नागरिक

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!