छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर चप्पल फेकल्याने पुण्यात संतापाचा उद्रेक!


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस..

हडपसरमध्ये संतप्त नागरिकांचा निषेध; धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय — पोलिस तपासाची मागणी….

पुण्यातील हडपसर परिसरातील ससाणेनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर एका महिलेने चप्पल फेकल्याच्या घटनेने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी तीव्र निषेध नोंदविला असून, दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या पुणे परिसराला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची मोठी परंपरा लाभली आहे. पुणे परिसरात दुष्काळ, रोगराई आणि अस्थिरतेचे संकट असताना जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांनी पुण्याच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले. पुण्याच्या भूमीवर ‘सोन्याचा नांगर’ फिरविल्याची ऐतिहासिक परंपरा आजही लोकभावनेत जिवंत आहे.
अशा ऐतिहासिक वारशाच्या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चप्पल फेकण्याची घटना घडल्याने शिवप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिलेने पायातील चप्पल काढून पुतळ्याच्या दिशेने ती फेकली. घटनेनंतर परिसरात नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे का, संबंधित महिलेने हे कृत्य स्वतःहून केले की तिला कोणी प्रवृत्त केले, तसेच या घटनेमागे सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कोणताही हेतू होता का, याचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे.
‘मानसिक आजार’ असल्याचे कारण देऊन प्रकरण दडपले जाऊ नये; मात्र त्याबाबत अधिकृत वैद्यकीय व पोलिस तपासातूनच सत्य समोर यावे, अशीही नागरिकांची भूमिका आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, शहर बंदची हाक देण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेवर विविध राजकीय नेते आणि सामाजिक नेते काय भूमिका घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कारण काय? कोणाचा हात आहे का? धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या निष्पक्ष तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.

Advertisement

शिवरायांचा अवमान सहन केला जाणार नाही; पण सामाजिक शांतताही अबाधित राहिली पाहिजे!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!