कात्रजमध्ये रक्तरंजित थरार:भरदिवसा गोळ्या झाडून आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावाचा हाकनाक बळी…


पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा…

पुणे शहरातील टोळी युद्धात हाकनाक बळी
आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या
पुणे शहरात सुरू असलेल्या टोळीयुद्धाने पुन्हा एकदा रक्तरंजित वळण घेतले असून कात्रज परिसरातील बालाजी नगर येथे बुधवारी सकाळी एका तरुणाची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत तरुणाचे नाव अक्षय उर्फ बाळा बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे असून तो वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश म्हस्के याचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. आंदेकर खून प्रकरणाशी संबंधित आरोपींच्या कुटुंबातील ही तिसरी हत्या असल्याने या टोळीयुद्धाने आणखी गंभीर स्वरूप धारण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी बालाजी नगर परिसरात काही हल्लेखोर दबा धरून बसले होते. अक्षय म्हस्के घटनास्थळी आल्यानंतर त्याच्यावर जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर व तोंडावर कोयत्याने वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या केली. गोळ्या लागल्याने अक्षयचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, गुन्हे शाखा व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासले जात आहेत. या घटनेनंतर कात्रज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठ परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आंदेकर यांच्या बहिणीसह २१ जणांना अटक करण्यात आली होती आणि पोलिसांनी तब्बल १७०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये कोंढवा परिसरात समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचाही भरदिवसा खून करण्यात आला होता. आता अक्षय म्हस्केच्या हत्येमुळे आंदेकर प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्याचे सत्र अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे शहरातील वाढते टोळीयुद्ध, खुलेआम होणारे हल्ले आणि भरदिवसा होणाऱ्या हत्या यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!