आमच्यावरचा जनतेचा विश्वास कमी झालेला आहे, तो पुन्हा मिळवण्यासाठी जीवाचं रान करु :- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. याबाबत त्यांच्या पक्षाची आज बैठक पार पडली. यानंतर अजित पवार आणि नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी अजित पवारांनी आपला पराभव मान्य करत महाराष्ट्रात मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे, अशी जाहीर कबूली त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट झालेल्या बैठकीत काही आमदार उपस्थित राहू शकले नाहीत कारण त्यांच्या काही अडचणी होत्या. पण बाकी सर्वजण हजर होते त्यावरुन आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत हे आजच्या बैठकीवरुन लक्षात आलं आहे. त्यामुळं विरोधक जे बोलले की त्यांच्या संपर्कात आमचे आमदार आहे, हे काही खरं नाही. आता उद्याच्या विधानसभेला नाउमेद न होता सामोरं जायचं आहे, आमची महायुती आहे. लोकसभेच्या ४८ जागांपैकी वाटप करताना काय त्रृटी झाल्याचा आम्ही विचार करु, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वात मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या आमदारांची बैठक झाली.
या बैठकीत पराभव झाला तरी चालेल, पण अजित पवार यांची साथ सोडणार नाही, असं आमदारांनी एकमताने निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कुठलाही आमदार शरद पवार यांच्या पक्षातील आमदारांच्या संपर्कात नसल्याची ग्वाही देखील बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे.



