बेकायदेशीर प्रचार कार्यालय थाटून माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा जमीन बळकवण्याचा प्रयत्न
औरंगाबाद प्रतिनिधी :- संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू असताना औरंगाबाद सिल्लोड शहरात माजी आमदार व शिंदे शिवसेना चे स्थानिक उमेदवार अब्दुल सत्तार यांनी पठाण परिवाराची वडिलोपार्जित 2 एकर 34 गुंठे जमीन बेकायदेशीर ताबा घेऊन निवडणूक कार्यालय थाटले पठाण परिवाराने साखळी उपोषण केले असल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले..

सिल्लोड शहरातील सर्वे नंबर 377 मध्ये पठाण परिवाराने दावा केला आहे की, त्यांची तिथे वडिलोपार्जित 02 एकर 34 गुंठे जमीन शिल्लक आहे. सदर प्रकरणात त्यांचा कायदेशीर प्रशासकीय व न्यायालयीन लढा सध्या सुरू असून, विविध ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. त्यांच्या जमिनीवर मंत्री अब्दुल सत्तार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी “जय दुर्गा नवरात्र उत्सव” साजरा करण्यासाठी तात्पुरती परवानगी काढून तिथे नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी भव्य मोठे मंडप/ शेड उभारले होते. त्यामुळे पठाण परिवाराने त्या बाबत दिनांक 02.10.2024 रोजी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी कारवाई न केल्यामुळे पठाण परिवार दिनांक 07.10.2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. सदर आमरण उपोषण तब्बल 10 दिवस सुरू होते, शेवटी पोलिसांनी पठाण परिवारास आश्वासन दिले होते की, नवरात्र उत्सव संपल्यानंतर तेथील मंडप/ शेड काढण्यात येईल, कारण दिलेली परवानगी ही तात्पुरती स्वरूपाची आहे. त्यामुळे पठाण परिवाराने आमरण उपोषण स्थगित होते.
परंतु नवरात्र उत्सव संपून देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंडप व शेड काढले नाही, त्यामुळे व्यथित होऊन पठाण परिवार यांनी दिनांक 25.10.2024 रोजी पुन्हा पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासन यांना लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची विनंती केली होती. तसेच कारवाई न केल्यास दिनांक 04.11.2024 पासून त्यांच्या जमिनीवर सहपरिवार साखळी उपोषण सुरू करण्याबाबत सुद्धा त्यांनी कळविले होते. सदर प्रकरणाची दखल घेऊन तालुका दंडाधिकारी सिल्लोड यांनी पोलीस निरीक्षक यांना दिनांक 26.10.2024 रोजी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणे बाबत पत्र दिले होते.
पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन कसलीच कारवाई करत नसल्यामुळे शेवटी पठाण परिवार यांनी आज दिनांक 04.11.2024 रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या जागेवर जाऊन साखळी उपोषण सुरू केले. त्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाद विवाद झाला. सदर ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार यांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. पठाण परिवार व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन साखळी उपोषण स्थगित करण्यात बाबत निर्देश दिले.
पठाण परिवार सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सध्या सदर जागेवर मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाचे लोक जमा झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पठाण परिवाराने मागणी केली आहे की, सदरील मंडप/ शेड बेकायदेशीर असल्यामुळे तसेच त्याचा वापर निवडणूक प्रचार कार्यालय म्हणून करत असल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा.अशी मागणी करण्यात आली…



