पुणे शहरात पूरसदृढ परिस्थिती निर्माण करणाऱ्या अधिकाऱयांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :- किशोर कांबळे
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
खडकवासला धरणातून २५ जुलै २०२४ पाणी सोडल्यानंतर नदीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले होते. तसेच पुलाची वाडी या परिसरामध्ये तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अनैसर्गिक पुराला आणि तरुणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे आणि जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांना सेवेतून बडतर्फ करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी केली आहे.
नदीपात्रात सोडलेला पाणी विसर्ग व संबधित कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितलेला खडकवासला धरणातून पाणी विसर्ग यामध्ये खूप मोठया प्रमाणावर तफावत आहे. कुऱ्हाडे यांनी त्यावेळी खडकवासला धरणातून ३५००० क्युसेक पाणी सोडल्याची माहिती प्रशासन आणि प्रसारमाध्यमांना दिली होती. वास्तविक पाहता त्यांनी ६१,१७८ क्युसेक पाणी सोडले गेले होते हे आता माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून सिद्ध होत आहे.
पुणे शहरामध्ये बंडगार्डन पाटीलवस्ती, विठ्ठलनगर ही महत्वाची पुरबाधित ठिकाणे आहेत. खडकवासला धरणाच्या सांडव्याची विसर्ग क्षमता ९७००० क्युसेक्स इतकी आहे. मात्र नदीपात्रातील अतिक्रमणे व वसाहती यामुळे ५०००० क्युसेक्स विसार्गालाच पुर परिस्थिती निर्माण होते. याबाबींवर लक्ष केंद्रीत करून पुणे शहरात कमीत कमी पूर येईल अशा दृष्ट पवना धरण, खडकवासला व त्याच्या वरच्या बाजुस असणाऱ्या धरणातून सोडावयाच् विसर्गाचे नियोजन करण्यात येते. पुर नियंत्रणाचे संबंधित सर्व यंत्रणांनी योग्य तऱ्हेने समन्वय राखुन काम केल्याने पुणे शहरातील पुर परिस्थिती सन २००६,२००७ व २००८ या तिन्ही वर्षात अतिवृष्टी होऊनदेखील नियंत्रणात ठेवण्या प्रशासनास यश आले आहे. पुणे शहरातील बंडगार्डन येथे धोका पातळी ५४५.८३ मी. व धोकापातळीचा विसर्ग १,६८,५५८ क्युसेक्स आहे.
किशोर कांबळे म्हणाले की, खडकवासला धरणांच्या सांडव्यातून चुकीच्या पध्दतीने पाणी सोडल्यांमुळे तसेच पाणी सोडलेली खोटी आकडेवारी देवून शासनाची व पुणेकरांची दिशाभूल संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. वास्तविक वेळ (R.T.D.A.S) प्रणालीतील विसर्ग माहिती व प्रत्यक्ष धरण क्षेत्रातील व विभागीय कार्यालयातील खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पूर विसर्गची खोटी माहिती प्रसारित करून सर्वांची दिशाभूल केली. यासाठी अनेक कारणे देण्यात येत होती. या परिस्थितीला नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा तसेच नदीसुधार प्रकल्पाचे काम जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच अनेक नवनवीन कारणे पुढे आणली जात होती. मात्र माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार या पुरास हे दोन्ही अधिकारीच जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यांच्या गलथान कारभारामुळे तीन होतकरू युवकांचा जीव गेला. हजारो नागरिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंपदामंत्र्यांकडे आणि पोलीस आयुक्तांकडे केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.



