काळूबाईचा अवतार असल्याचा दावा; ‘अघोरी’ पूजा करून ४५ हजारांची फसवणूक? बिबवेवाडीत मोनाली विधातेविरोधात गुन्हा


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस..

बिबवेवाडी परिसरातील कथित गुरुवर्य, काळूबाईचा अवतार अडचणीत. सोलापूर येथील बांधकाम व्यावसायिक कौटुंबिक अडचणी आणि विविध पीडा दूर करण्याचे आमिष दाखवत एका बांधकाम व्यावसायिकाकडून ऑनलाइन पद्धतीने ४५ हजार रुपये घेतल्याप्रकरणी बिबवेवाडी परिसरातील मोनाली कृष्णा विधाते, तिचे पती कृष्णा विधाते आणि इतर साथीदारांविरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरातील रहिवासी असून ते बांधकाम व्यवसाय करतात. सोशल मीडियावर त्यांनी ‘गुरुवर्य मोनाली आई विधाते’ या नावाने प्रसारित करण्यात आलेला व्हिडिओ पाहिला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून कौटुंबिक अडचणी व पीडा दूर करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.
तक्रारदार डिसेंबर २०२५ मध्ये मोनाली विधातेच्या संपर्कात आले. त्यानंतर कथित पूजा-विधीसाठी हळदी-कुंकू, बाहुली आणि दोर पाठविण्यात आला आणि त्यासाठी ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, त्यानंतरही कौटुंबिक अडचणी दूर न झाल्याने तक्रारदाराला बिबवेवाडीतील सुखसागारनगर परिसरातील घरी बोलावण्यात आले. तेथेही अडचणी दूर करण्याचे आमिष दाखविण्यात आले. तसेच तक्रारदाराला मृत्यूची भीती दाखवून ऑनलाइन स्वरूपात ४५ हजार रुपये घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Advertisement

‘काळूबाईचा अवतार’ असल्याचा कथित दावा…

मोनाली विधाते स्वतःला काळूबाईचा अवतार समजत असल्याचे तसेच गुरुवर्य म्हणून अनुयायांवर प्रभाव निर्माण करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सोशल मीडियावर तिचे विविध व्हिडिओ प्रसारित झाले असून, त्यामध्ये कथित धार्मिक व अघोरी स्वरूपाच्या पूजा-विधींचे प्रकार दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने परिधान करून पूजा-विधी करत असल्याचेही दिसते.
या प्रकारातून अनेक नागरिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता असून, भीतीपोटी काही नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून यामागील संपूर्ण आर्थिक व सामाजिक साखळी उघड करण्याची मागणी होत आहे.

मोनालीसह पाच जणांविरोधात गुन्हा..

या प्रकरणात मोनाली विधाते, तिचे पती कृष्णा विधाते (दोघे रा. सुखसागारनगर, कात्रज), मोनालीचा भाऊ मयूर, अशोक बनकर आणि मंजू कौर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सोशल मीडिया आणि यूट्यूबवर मोनाली विधातेविरोधात विविध बातम्या व आरोप प्रसारित होत असल्याचेही समोर आले आहे. तसेच तिच्याविरोधात PITA कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याचे काही सोशल मीडिया वृत्तांमध्ये नमूद करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्याची अधिकृत नोंद व पोलिसांकडून स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.
धमकी दिल्याचाही आरोप
तक्रारदाराला जिवे मारण्याची तसेच मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. मोनाली विधाते आणि तिच्या साथीदारांनी अशाच पद्धतीने आणखी नागरिकांची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
टीप : वरील प्रकरणातील आरोप हे तक्रारदाराच्या फिर्यादीवर आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांडण्यात आले आहेत. आरोप सिद्ध होईपर्यंत संबंधित व्यक्तींना दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही. प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतर होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!