गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एरंडवणेत दरोड्याच्या तयारीचा पर्दाफाश; धारदार शस्त्रांसह पाच जणांना अटक..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एरंडवणे परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना डेक्कन पोलिसांनी धारदार हत्यारे, लाल तिखटाची चटणी पावडर व इतर साहित्यांसह ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा संभाव्य प्रकार घडण्यापूर्वीच कारवाई करण्यात आली.
डेक्कन पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एरंडवणे येथील मित्र मंडळ (चावडी) परिसरातील गणेश मंदिराच्या इमारतीच्या मजल्यावर काही इसम धारदार हत्यारे, लाल तिखट व इतर साहित्य घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत लपून बसले आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे डेक्कन पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेले. एरंडवणे पुणे येथील एका दोन मजली इमारतीच्या वरील मजल्यावर पोलिसांनी पाहणी केली असता, दरवाजा उघडल्यानंतर तेथे पाच इसम आढळून आले. त्यांच्या जवळ तसेच टेबलवर धारदार हत्यारे, लाल रंगाची चटणी पावडर व इतर साहित्य आढळून आले.
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७८/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह शस्त्र कायदा कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:-
रितेश गुरुनाथ चिप्पा (वय २५) — रा. गंजपेठ, महात्मा फुले वाड्यासमोर, समता भूमी, पुणे.
विकास नितीन लांबोर (वय १९) — रा. प्लॉट नं. १५, संजीवनी हॉस्पिटलजवळ, खिलारेवाडी, पुणे.
प्रतिक हनुमंत कांबळे (वय १९) — रा. सीडीएस कंपनीजवळ, गणेशनगर, चाळ नं. १०, एरंडवणे, अलंकार, पुणे.
प्रतिक रामचंद्र कदम ऊर्फ बाबू (वय २३) — रा. प्लॉट नं. १५, संजीवनी हॉस्पिटलजवळ, खिलारेवाडी, पुणे.
सुजल मनोज मोरे (वय १९) — रा. चाळ नं. ए/३/१८, खोली नं. २०, इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बन्सोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त अनूजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजितसिंह परदेशी, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, अजय भोसले, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे, तसेच प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, सचिन गायकवाड, सागर धाडगे, वसीम सिद्दीकी, धनाजी माळी आणि स्वप्निल गायकवाड यांचा सहभाग होता.

