भ्रष्टाचारी राक्षस पुणे महापालिकेच्या पथ विभागावर – नागरिकांच्या कररूपी पैशावर अधिकारी-ठेकेदारांचा डल्ला


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस….

पुणे : – पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. टेंडर क्र. 155/23 अंतर्गत जुना प्रभाग क्र. 38 मधील डॉल्फिन चौक ते राजस सोसायटी मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करून विकासाचे काम दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता तयार न होता फक्त कागदावरच रंगवला गेला आणि बिल काढून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले आहे.

नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टेंडरनुसार तब्बल 23 लाख 26 हजार 702 रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात जागेवर कोणताही रस्ता तयार झालेला नाही. माहिती अधिकारातून विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांनी “काम झाले आहे” असे उत्तर दिले, मात्र नेमके कुठे झाले हे सांगण्यात ते असमर्थ ठरले. ही बाब प्रशासनातील गंभीर भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.

Advertisement

या प्रकरणात अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुधीर चव्हाण, तसेच उपअभियंता धनंजय गायकवाड यांच्या भूमिकेबद्दल नागरिकांनी गंभीर आक्षेप घेतले असून, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनी EIL वरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “सुपरव्हिजन”च्या नावाखाली सल्लागारांनी देखील नागरिकांच्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप होत आहे.

संबंधित ठेकेदार C. K. असोसिएट्स यांनी काम पूर्ण केल्याचे दाखवून लाखो रुपयांचे बिल काढले आहे. मात्र जागेवर काम कुठेच न झाल्याने या कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, महापालिकेने खर्च केलेले पैसे वसूल करावेत, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. करदात्यांचा पै पैसा अशा भ्रष्टयुतीतून उधळला जाणे, ही जनतेची थेट फसवणूक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे..


2 thoughts on “भ्रष्टाचारी राक्षस पुणे महापालिकेच्या पथ विभागावर – नागरिकांच्या कररूपी पैशावर अधिकारी-ठेकेदारांचा डल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!