“महाराष्ट्र सुन्न! अजित दादांच्या विमान अपघाताची धक्कादायक घटना… बारामती, पुणे जिल्हा वर शोककळा”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बारामतीमध्ये त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, बारामतीत उतरत असताना गोजुबावी परिसरात हे विमान अपघातग्रस्त झाल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ९ ते ९.३० दरम्यान हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त विमान हे खाजगी VSR एव्हिएशन कंपनीचे असल्याची माहिती आहे. विमानातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर बारामतीत शोककळा पसरली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
विमानातील प्रवासी (मिळालेल्या माहितीनुसार)
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
पायलट कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)
मुंबई येथून विमानाने सकाळी 08.10 वाजता टेकऑफ केल्याची माहिती आहे. तर बारामतीत 08.50 वाजता लँडिंगचे नियोजन होते.
दिल्लीतील हालचाली वाढल्या
केंद्रीय बजेट सेशन सुरू होणार असल्याने पवार कुटुंबीय सध्या दिल्लीमध्ये असल्याची माहिती आहे. अपघाताची बातमी मिळताच संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या निवासस्थानी एकत्र जमल्याचे समजते.
मोदी-शाह यांची फडणवीसांशी चर्चा
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून घटनेची माहिती घेतल्याचे समजते.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

