“गुटखा माफियांना मोठा झटका; आता थेट मकोकाखाली कारवाई!”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
राज्यभरात गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त प्रतिबंधित पदार्थांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेट्सविरोधात आता थेट मकोकाची कारवाई होणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशांमुळे राज्यातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका ठरणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण साखळीवर लक्ष केंद्रित करत संघटित गुन्हेगारीचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलेल्या अनेक प्रकरणांमध्ये केवळ किरकोळ विक्रेते नव्हे, तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते, वित्तपुरवठादार आणि इतर सहकारी घटकांचे मोठे जाळे कार्यरत असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी बनावट कागदपत्रे, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे आणि आंतरराज्य पुरवठा साखळीद्वारे हा व्यवसाय सुरू असल्याचेही उघड झाले आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत राज्यात या पदार्थांवर बंदी असतानाही सुरू असलेल्या या अवैध व्यापारामुळे युवकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांकडे केवळ अन्नसुरक्षा उल्लंघन म्हणून न पाहता, संघटित गुन्हेगारी म्हणून तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदींनुसार दोषींना कारावास आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे. आता पात्र प्रकरणांमध्ये मकोका लागू झाल्यास संबंधित आरोपींवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील गुटखा आणि तंबाखू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अवैध व्यापाराविरोधातील लढ्याला नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

