स्वारगेटमध्ये खंडणी रॅकेटचा पर्दाफाश – अपहृत व्यापाऱ्याची सुटका, ५ आरोपी अटकेत”


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

टिंबर मार्केट परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याची अवघ्या २४ तासांत सुखरूप सुटका करत पुणे गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी १ कोटी ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे…

दिनांक २४ मार्च २०२६ रोजी गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याचे टिंबर मार्केट येथून काही इसमांनी अपहरण केले. अपहरणानंतर आरोपींनी व्यापाऱ्याच्या पत्नीला तब्बल १.५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत दोन विशेष पथके तयार केली. आरोपींनी खंडणीची रक्कम स्वारगेट येथील मित्र मंडळ चौकात आणण्यास सांगितल्याने पोलिसांनी सापळा रचला.
रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी अपहरणात सामील इतर तीन साथीदारांची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने खेड शिवापूर येथे धाड टाकून अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आणि उर्वरित तिघांनाही अटक केली.
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे शहर व ग्रामीण भागात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी संयुक्तरित्या पार पाडली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!