नाशिक हादरलं! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे – ५ नरबळींचा संशय, कोर्टाने पोलीस कोठडी वाढवली!”
प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने दिवसेंदिवस अधिक गंभीर वळण घेतलं असून तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आरोपी अशोक खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्याच्या पोलीस कोठडीबाबत महत्त्वाची सुनावणी पार पडली.
क्राईम ब्रांच आणि विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीची पोलीस कोठडी संपत असल्याने ती वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितलं की, प्रकरण अत्यंत गंभीर असून तपासासाठी आणखी वेळ आवश्यक आहे. विशेषतः लैंगिक अत्याचाराशी संबंधित डिजिटल पुरावे गोळा करण्याचं काम अद्याप सुरू आहे.
तपासादरम्यान आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले असून, अनेक महिलांनी आरोपीविरोधात तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारींची चौकशी अत्यंत गोपनीय पद्धतीने केली जात आहे.
या प्रकरणाला अधिक धक्कादायक वळण देणारी बाब म्हणजे आरोपीकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आलं असून, त्याचा वापर करून पाच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात काही प्राथमिक पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपीकडे काही मालमत्तेची कागदपत्रेही आढळून आली असून, त्याद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय आहे.
याशिवाय, अशोक खरात भक्तांना साप आणि वाघ दाखवायचा, बोटात घालायचे खडे व ‘मिश्रित पाणी’ यांचा वापर करायचा, अशी माहितीही तपासात उघड झाली आहे. त्याच्याकडून पाच जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. अखेर न्यायालयाने अशोक खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एकूणच, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचं आणि संवेदनशील होत असून, पुढील तपासात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

