गॅस टंचाईत काळाबाजार फोफावला; पुण्यात १०३ सिलेंडरसह मोठी कारवाई!


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस….

इराण–अमेरिका–इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस टंचाई निर्माण झाल्याचा गैरफायदा घेत काही टोळ्या अवैधरित्या गॅस साठवणूक व विक्री करत असल्याची माहिती समोर येत होती. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुणे शहरातील हांडेवाडी परिसरात घरगुती गॅसचा अवैध साठा करून काळाबाजार करणाऱ्या इसमावर काळेपडळ पोलीसांनी मोठी कारवाई करत तब्बल १०३ गॅस सिलेंडर आणि चारचाकी वाहनासह आरोपीस अटक केली आहे.

काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत विशेष तपास व पेट्रोलिंग सुरू होते.
दरम्यान, पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हांडेवाडी परिसरातील काव्या मल्टी सर्व्हिसेस येथे छापा टाकण्यात आला. छाप्यात एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक व ५ किलोच्या सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत असल्याचे उघड झाले. ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण करणारी आहे.
पोलिसांनी आरोपी नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी, पुणे) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत १०३ गॅस सिलेंडर व एक मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पो असा एकूण सुमारे १०,०९,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६४/२०२६ अंतर्गत अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ६) श्री. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमित शेटे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

गॅस काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांचा कडक इशारा – “अवैध साठा व विक्री सहन केली जाणार नाही!”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!