डिजिटल गव्हर्नन्समध्ये पुण्याचा देशभर डंका; ‘PMC 360’ ला राष्ट्रीय सिल्व्हर अवॉर्ड!


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

दि. ४ जून २०२६ : पुणे महानगरपालिकेने डिजिटल प्रशासन आणि नागरिकाभिमुख सेवांच्या क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठत राष्ट्रीय स्तरावरील मानाचा सन्मान पटकावला आहे. भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाकडून (DARPG) प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या ‘PMC 360’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल परिवर्तन प्रकल्पाची सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड करण्यात आली…

ई-गव्हर्नन्स अंतर्गत जिल्हा/शहरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील उपक्रम’ या प्रतिष्ठित श्रेणीत पुणे महानगरपालिकेला हा गौरव प्राप्त झाला आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेटर राहुल जगताप यांच्या सहकार्याने डिजिटल परिवर्तनाची व्यापक मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचे संपूर्ण आधुनिकीकरण, विविध डिजिटल प्रणालींचे पुनरुज्जीवन (Revamp), नागरिकांसाठी नवीन ऑनलाइन सेवा, तक्रार व्यवस्थापन प्रणाली तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवांचा विकास करण्यात आला. या सर्व उपक्रमांचे सादरीकरण नवी दिल्ली येथे तज्ज्ञ समितीसमोर करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन प्रक्रियेत ‘PMC 360’ प्रकल्पाने आपली छाप पाडत सिल्व्हर अवॉर्ड मिळविला.

Advertisement

PMC 360’ अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन संकेतस्थळ, ऑनलाइन सेवा पोर्टल, तक्रार विश्लेषण व निवारण प्रणाली, व्हॉट्सअॅप आधारित नागरिक सेवा आणि एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना जलद, पारदर्शक, सुलभ आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होत आहेत.
समृद्ध ऐतिहासिक वारसा जपत पुणे शहर आज डिजिटल प्रशासनातील देशातील अग्रगण्य शहरांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मधील हा सन्मान पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञान भागीदार आणि पुणेकर नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश मानले जात आहे.
PMC 360’ च्या यशामुळे स्मार्ट गव्हर्नन्सच्या दिशेने पुण्याने आणखी एक भक्कम पाऊल टाकले असून, देशातील इतर शहरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!