“समता भूमीवर सायरनचा थरार; पुनर्वसनाच्या नावाखाली नागरिकांमध्ये दहशत?”
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा..
महात्मा फुले वाडा समताभूमी परिसरात, दवंडी, सायरन आणि अचानक मिटिंग घोषणेमुळे पुण्यात खळबळ; “संवाद हवा, भीती नको” — नागरिकांचा संताप…
पुण्यातील महात्मा फुले समता भूमी परिसरात प्रशासनाच्या कथित कारभारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. सायरन, दवंडी आणि अचानक मिटिंगच्या घोषणांमुळे विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या कुटुंबांमध्ये घबराट पसरल्याची चर्चा रंगली आहे.
दि. 15 मे 2026 रोजी संध्याकाळी परिसरात भोंगे लावून एक वाहन फिरत होते. त्या वाहनातून दि. 16 मे रोजी दुपारी 1 वाजता नागरिकांची मिटिंग बोलावण्यात आल्याची घोषणा करण्यात येत होती. या अचानक झालेल्या घोषणेमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडले, तर काही काळ परिसरात नेमकं काय घडतंय याबाबत संभ्रम निर्माण झाला.
विशेष म्हणजे, याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी “लोकांना विश्वासात घेऊन पुनर्वसन प्रक्रिया राबवावी” असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्याच दिवशी सायरन आणि दवंडीच्या माध्यमातून नागरिकांना मिटिंगसाठी बोलावले गेल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिक अविनाश देवकुळे यांनी सांगितले की, “सायरनचा आवाज ऐकून काही वेळ काय घडतंय हेच समजलं नाही. वृद्ध लोक घाबरले, महिलांनी घराबाहेर येऊन विचारणा सुरू केली.”
या संदर्भात संबंधित वाहनातील मुकादम निहाल कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “DSI महेंद्र सावंत साहेबांचे आदेश आहेत. माझा संबंध नाही, मी फक्त काम करतोय,” असे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
यानंतर DSI महेंद्र सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “AMC अधिकारी प्रदीप आव्हाड साहेबांचे आदेश आहेत,” असे सांगितल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, AMC अधिकारी प्रदीप आव्हाड यांनी वरिष्ठ स्तरावरून सूचना आल्याचे सांगत नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराट लक्षात घेता संबंधित अनाउन्समेंट थांबवण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच दि. 16 मे रोजी होणारी मिटिंग रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुण्यासारख्या आधुनिक शहरात प्रशासनाकडे मोबाईल संपर्क, अधिकृत नोटीस, पत्रव्यवहार आणि डिजिटल माध्यमे उपलब्ध असताना सायरन व दवंडीच्या माध्यमातून अचानक मिटिंगची घोषणा करण्याची गरज का भासली, असा सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांच्या भावना व्यक्त करताना काहींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या —
“मतदान मागताना दवंडीची गरज नव्हती… तेव्हा मात्र घरोघरी येत होते.”
“लोकांना आधी विश्वासात का घेतलं नाही?”
“पुनर्वसन हवं… पण दहशत नको!”
सध्या महात्मा फुले समता भूमी परिसरात एकच चर्चा रंगली आहे —
“संवादाने प्रश्न सुटणार… की भीती दाखवून?”



