बिबवेवाडीतील सराईत वाहनचोर पोलिसांच्या जाळ्यात; चोरीची दुचाकी जप्त!
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा…
युनिट १, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत बिबवेवाडी परिसरात वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नं. ३५७/२०२५ (बीएनएस कलम ३०३ (२)) अंतर्गत सुरू असलेल्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
दिनांक १८ मार्च २०२६ रोजी, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. पोलीस अंमलदार मठपती यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संबंधित आरोपी हा बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगर परिसरात राहत आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर छापा टाकून सुरज शिवाजी सुरवसे (वय २५ वर्षे) याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेली सुमारे २५,००० रुपये किंमतीची होंडा युनिकॉर्न (सिल्वर रंग, MH 12 GP 3361) ही दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत असून आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांच्या पथकाने पार पाडली.
नागरिकांना आवाहन :-
वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करावे व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे



