“पुण्यात दहशत माजविण्याचा डाव उधळला! देशी पिस्तूलसह सराईत आरोपी पर्वती पोलिसांच्या जाळ्यात”
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा…
पुणे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीस पर्वती पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले. आरोपीकडून देशी पिस्तूल व जिवंत काडतूस असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १३ मार्च २०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण पवार व त्यांच्या पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला.
या कारवाईत आरोपी अजित सागर कसबे (वय २१, रा. स. नं. १५, विघ्नहर्ता सोसायटी, फ्लॅट नं. ५०४, आंबेगाव पठार, धनकवडी, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस असा एकूण ₹४०,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ६८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०२ मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार व पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, अमित चिव्हे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सद्दाम शेख व अमोल दबडे यांनी ही कामगिरी बजावली.

