“10 वी बोर्ड पेपरफुटीची अफवा; टेलिग्रामवरील चलाख ट्रिक उघड, आरोपीचा धक्कादायक खुलासा”


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत 10 वी महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा बनाव करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका तरुणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेलिग्राम अ‍ॅपवरील तांत्रिक “Replace” ट्रिक वापरून विद्यार्थ्यांना पेपर आधीच लीक झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. या प्रकारामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस तपासात चैतन्य विनोद शेंडे (वय १८) या आरोपीने अत्यंत चलाख पद्धतीने विद्यार्थ्यांना गंडा घातल्याचे कबूल केले आहे. आरोपी टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये पासवर्ड प्रोटेक्टेड PDF फाईल अपलोड करून “माझ्याकडे उद्याच्या परीक्षेचा प्रश्नपत्रिका पेपर आहे” असा दावा करत होता. तो विद्यार्थ्यांकडून सुमारे ₹600 आकारून पेपर देण्याचे आमिष दाखवत असे.
अशी रचली होती फसवणुकीची योजना
पोलिस तपासात या संपूर्ण फसवणुकीची पद्धत समोर आली आहे –
परीक्षेच्या एक दिवस आधी आरोपी टेलिग्राम ग्रुपमध्ये पासवर्ड प्रोटेक्टेड PDF फाईल अपलोड करत असे.
त्यानंतर “उद्याचा पेपर माझ्याकडे आहे” असा दावा करून ₹600 मध्ये पेपर देण्याची ऑफर दिली जात असे.
काही विद्यार्थ्यांनी पैसे पाठवल्यानंतर आरोपी त्यांना तात्काळ ब्लॉक करत असे.
परीक्षा संपल्यानंतर आरोपी खरी प्रश्नपत्रिका मिळवून आधी अपलोड केलेली PDF फाईल ‘Replace’ करत असे.
त्यामुळे टेलिग्रामवर पेपर आधीच अपलोड केला होता असा खोटा पुरावा तयार होत असे.
‘Replace’ ट्रिकमुळे निर्माण झाला खोटा कालक्रम
पोलिसांच्या माहितीनुसार, टेलिग्राममध्ये एकदा अपलोड केलेली फाईल नंतर बदलली तरी मूळ अपलोडची वेळ (टाइमस्टॅम्प) तशीच राहते आणि फक्त “Edited” असा उल्लेख दिसतो. या तांत्रिक सुविधेचा गैरवापर करून आरोपीने पेपर आधीपासूनच त्याच्याकडे असल्याचा खोटा आभास निर्माण केला.
विद्यार्थ्यांना पोलिसांचे आवाहन
या प्रकारामुळे बोर्ड परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर फिरणाऱ्या पेपर लीकच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवू नयेत, असे आवाहन केले आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या इतर व्यक्तींचा शोधही पोलीस घेत आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!