पुणे पोलीस भरतीचा बिगुल! १६ फेब्रुवारीपासून रणांगण सज्ज; १७६३ पदांसाठी तब्बल १.८५ लाख उमेदवार मैदानात


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात होत असून १६ फेब्रुवारीपासून मैदानी चाचण्यांचा बिगुल वाजणार आहे. पोलीस अंमलदार, वाहनचालक आणि बॅडसमन अशा १६३३ पदांसह कारागृह पोलीसांच्या १३० पदांसाठी एकूण १७६३ जागांसाठी तब्बल १.८५ लाख उमेदवारांनी अर्ज केल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र होणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

मैदानी चाचणी कुठे आणि कशी?

पोलीस मुख्यालय तसेच राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट क्रमांक दोनच्या मैदानावर शारीरिक व मैदानी चाचण्या होणार आहेत. उंची व छाती मोजणी, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक या चाचण्यांचा समावेश आहे. एकूण १०० गुणांपैकी किमान ५० गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुढे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
RFID आणि CCTVची कडक नजर..

Advertisement

भरती प्रक्रियेत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही निगरानीखाली पार पडेल. उमेदवारांची उपस्थिती, धावण्याची वेळ आणि कामगिरी डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार असल्याने मानवी हस्तक्षेपाला मर्यादा येणार आहेत.
लेखी परीक्षेत कडक नियम
लेखी परीक्षेदरम्यान अधिकाऱ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी असेल. परीक्षाकेंद्रांवर कडक सुरक्षा ठेवून गैरप्रकार रोखण्यावर भर दिला जाणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
कोणत्याही मध्यस्थ किंवा कर्मचाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. कोणी पैशांची मागणी केल्यास अपर पोलीस आयुक्त (७३९१०८२६११) किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तरुणांसाठी सुवर्णसंधी
राज्यभरातील हजारो तरुण या भरतीकडे आशेने पाहत असून पुणे पोलीस भरती यंदा सर्वाधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!