पुण्यात घरफोड्यांचा थरार उघड; उत्तर प्रदेशचा गँगस्टर विश्रामबाग पोलिसांच्या तावडीत, ६२ लाखांचे दागिने जप्त”


पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा…

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडी प्रकरणाचा छडा लावत उत्तर प्रदेशमधील एका कुख्यात गँगस्टरला अटक करत तब्बल ६२ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे शहरातील विविध भागात झालेल्या घरफोड्यांचा उलगडा या कारवाईमुळे झाला आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) व ३३१ (३) अन्वये अज्ञात आरोपींविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी घरात नसताना आरोपींनी घराचा दरवाजा तोडून चोरी केल्याची घटना घडली होती.
या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी तपास पथक प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना दिले. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळासह पुणे शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार आशिष खरात व अनिस शेख यांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपींचा मागोवा घेतला. आरोपी चोरी केल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये थांबून परराज्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर तपास पथकाने गुप्तपणे पाळत ठेवली. दरम्यान, एक महिन्यानंतर गुप्त माहितीदारामार्फत संशयित आरोपी पुन्हा घरफोडी करण्याच्या उद्देशाने ओंकारेश्वर मंदिर परिसरात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन्ही आरोपींना चारही बाजूंनी घेरून ताब्यात घेतले.

Advertisement

अटक केलेल्या आरोपींची नावे
आकाश सुभाष (वय २३) – सध्या सुंदरनगरी, दिल्ली; मूळ राहणार मेरठ, उत्तर प्रदेश
जितेंद्र चर्तुवेदी (वय ३२) – सुंदरनगरी, दिल्ली
चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेले दागिने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून ३२ तोळे सोने व १२५ ग्रॅम चांदी जप्त केली.
पुढील तपासात आरोपींनी जानेवारी महिन्यात विश्रामबागसह पुण्यातील इतर तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तपासादरम्यान मुख्य आरोपी आकाश सुभाष हा उत्तर प्रदेशातील ‘सनी गँग’शी संबंधित असून त्याच्यावर गाजियाबाद येथे खून, खुनाचा प्रयत्न व गँगस्टर अॅक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी दिल्ली व उत्तर प्रदेश येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींनी पुणे शहरात एकूण ५ ठिकाणी दिवस व रात्री घरफोड्या केल्याचे तपासात समोर आले.
या कारवाईत विश्रामबाग, समर्थ, खडक आणि भोसरी पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांमधील एकूण ६२,००,८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त हृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथक प्रभारी राजेश उसगावकर यांच्यासह पोलिसांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!