पुणे शहरात नवीन ५ पोलीस ठाण्यांना मंजुरी; परिमंडळ ६ व ७ नव्याने निर्माण
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अखेर शहरासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त व गृह विभागाने पुणे पोलिसांना पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली असून त्याचबरोबर दोन नवीन परिमंडळांनाही मान्यता मिळाली आहे. लोहगाव, लक्ष्मीनगर, नरे , येवलेवाडी आणि मांजरी ही नवी पोलीस ठाणे लवकरच कार्यान्वित होणार आहेत. तर शहरासाठी परिमंडळ (झोन) ६ आणि परिमंडळ ७ नव्याने उभे राहणार आहेत.
या नव्या मंजुरीनंतर पुणे पोलिसांचे कामकाज अधिक परिणामकारक होणार असून कायदा-सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन व गुन्हेगारी नियंत्रण या बाबींना चालना मिळेल. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या सर्व नवीन ठाण्यांसाठी व परिमंडळांसाठी ८३० हून अधिक मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी होऊन नागरिकांना अधिक वेगवान व तत्पर सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
पुणे पोलिस दलात पोलिस उपायुक्त दर्जाच्या सात अधिकाऱ्यांची पदे मंजूर करण्यात यावी, असा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मंजुरी दिली होती. त्यावर आता वित्त व गृह विभागाकडून मंजुरी मिळाल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार
शर्मा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात लवकरच ही पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे.



