बुधवार पेठेत कुंटणखान्यावर कारवाई; ४ फ्लॅट सीलबंद, ३ बांगलादेशी महिलांना ताब्यात


पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा

पुणे : बुधवार पेठ परिसरातील कुंटणखान्यांविरोधात फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत चार फ्लॅट एक वर्षासाठी सीलबंद केले असून, भारतात अनाधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे.

प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे १६/२०२६ गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत भरमे करत आहेत.
तपासादरम्यान कुंटणखाना चालविण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांविरोधात कारवाई करत संबंधित फ्लॅट सील करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार बुधवार पेठेतील बेगम बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक ३०९, न्यू वेलकम बिल्डिंगमधील दोन फ्लॅट तसेच दाणे आळी येथील एका वाड्यातील खोली अशा एकूण चार ठिकाणांना एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहे.
दरम्यान, वरिष्ठांच्या सूचनेनुसार फरासखाना पोलिसांनी रेड लाईट भागात विशेष मोहीम राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार पेठ परिसरात छापा टाकून तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. या महिलांनी गेल्या महिन्याभरापासून भारतात अनाधिकृतरीत्या वास्तव्य करत वेश्याव्यवसायातून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Advertisement

ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे जोशना शेख अली, कुलसुम खातून आणि अंजुरा बेगम अशी असून, त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे आढळून आले आहेत. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषिकेश रावले आणि सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि परदेशी महिलांच्या बेकायदेशीर वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बांगलादेश, नेपाळ, थायलंड आदी देशांमधून महिलांची तस्करी करून त्यांचा अशा प्रकारे वापर केला जात असल्याने हा विषय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही संवेदनशील मानला जात आहे.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!