“चोराला सोडून संन्याशाला फाशी! अवैध हॉस्पिटल विरोधात आवाज उठवणाऱ्या राऊतांवरच गुन्हा”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस..
पुरंदर तालुक्यातील सासवड परिसरातील जनहितार्थ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ शिवतारे यांच्या शैक्षणिक पात्रता व अतिदक्षता विभाग (ICU) चालविणाऱ्या डॉक्टरांच्या पात्रतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. संबंधित ठिकाणी BHMS व BAMS पदवीधारक डॉक्टरांकडून ICU व्यवस्थापन केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित डॉक्टरांकडे आवश्यक PGDEMS किंवा तत्सम आपत्कालीन वैद्यकीय पात्रता आहे का याची चौकशी करण्याची मागणी केली होती. अशी तक्रार ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश राऊत यांनी अवैध हॉस्पिटलविरोधातील तक्रारीनंतर कारवाईऐवजी तक्रारदारालाच लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला…
पुरंदर तालुक्यातील सासवड-बारामती परिसरातील अवैध रुग्णालयांविरोधात सातत्याने तक्रारी दाखल करणाऱ्या ग्राहक हक्क संघर्ष समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष महेश राऊत यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप होत असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
राऊत यांनी सासवड परिसरातील जनहितार्थ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. शिवतारे यांच्यासह काही खासगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या कथित अनियमितता आणि बेकायदेशीर कारभाराविरोधात आरोग्य विभाग, शल्यचिकित्सक कार्यालय तसेच पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींमुळेच सासवड पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.
ग्राहक हक्क संघर्ष समितीच्या वतीने राऊत यांनी सासवड शहरातील अनेक खासगी रुग्णालयांविरोधात निवेदन देत गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. अनेक रुग्णालयांकडे आवश्यक ना-हरकत दाखले (NOC) नसणे, रुग्णवाहिका व वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसणे, अग्निशमन यंत्रणा अपुरी असणे, काही ठिकाणी लिफ्टची सुविधा नसणे अशा अनेक त्रुटी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या.
तसेच काही रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग (ICU) चालविणाऱ्या डॉक्टरांच्या पात्रतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काही ठिकाणी BHMS व BAMS पदवीधारक डॉक्टरांकडून ICU व्यवस्थापन केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित डॉक्टरांकडे आवश्यक PGDEMS किंवा तत्सम आपत्कालीन वैद्यकीय पात्रता आहे का याची चौकशी करण्याची मागणी केली होती.
याशिवाय अनेक रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित परिचारिकांऐवजी दहावी-बारावी उत्तीर्ण महिलांकडून काम करून घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. रुग्णालयातून निघणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का, याचीही तपासणी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक पुणे यांनी या संदर्भात ११ सप्टेंबर रोजी जावक क्रमांक १०८०५/०७ तसेच जा.क्र. जिरुपु/आस्था/चौकशी १२००/२०५/२०२६ या पत्रांद्वारे ग्रामीण रुग्णालय सासवड प्रशासनाला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या पत्रांवर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सासवड-जेजुरी परिसरातील सर्व मान्यताप्राप्त ICU असलेल्या खासगी रुग्णालयांची सखोल चौकशी करून नियमबाह्य आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी पुन्हा एकदा केली आहे. अन्यथा या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे सासवड व पुरंदर तालुक्यात आरोग्य व्यवस्था, खासगी रुग्णालयांचे परवाने आणि पोलिसांची भूमिका यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा असताना तक्रारदार महेश राऊत यांच्याविरुद्धच सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारीच्या संदर्भात डॉक्टरांना धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महेश राऊत यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे सूडभावनेतून आणि तक्रार दडपण्याच्या उद्देशाने करण्यात आले असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
“जर एखाद्या हॉस्पिटलबाबत प्रशासनाकडे नियमांनुसार तक्रार दाखल केली असेल, तर त्यावर प्रशासनाने चौकशी करून कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र तक्रारदारावरच गुन्हा दाखल झाल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे,” असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
या प्रकरणामुळे अवैध हॉस्पिटलविरोधात आवाज उठवणाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे का? असा सवाल उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.



