“जैन बोर्डिंगचा वाद: ‘दोषी नाही, तरीही तुम्हाला न्याय मिळवून देईन’ – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे – जैन बोर्डिंग घोटाळ्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी जैन बोर्डिंग उपोषणस्थळी भेट देऊन जैन मुनींची भेट घेतली. या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते, कारण मोहोळ यांच्यावर या प्रकरणात सहभागाचे आरोप होत होते.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मोहोळ यांनी सर्व आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, “मी या प्रकरणात सहभागी नाही. माझा कुठलाही थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही, हे मी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.” ते पुढे म्हणाले, “मी येथे वंदनीय जैन गुरुदेवांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. जर मी दोषी असतो, तर इथे आलोच नसतो.”
मोहोळ यांनी जैन समाजाला न्याय देण्याचे आश्वासनही दिले. ते म्हणाले, “मी आपल्याला आश्वस्त करतो की या प्रकरणात योग्य न्याय होईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल. काही दिवसांत हा प्रश्न आपल्या अपेक्षेनुसार सोडवला जाईल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधी म्हणून समाजाने त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाला ते न्याय देतील.
जैन मुनींनी मात्र स्पष्टपणे सांगितले की, “जोपर्यंत हा विषय संपवला जात नाही, तोपर्यंत आम्ही समाधानी नाही.” त्यांनी माध्यमांचे आभार मानत हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मोहोळ यांनी सांगितले की, “राजकीय पातळीवर या विषयाचा गैरफायदा घेऊन काही मंडळींनी वैयक्तिक टीकेचा मार्ग अवलंबला. तरीही माझ्या जैन बांधवांनी एकदाही माझे नाव यात घेतले नाही, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”
राजू शेट्टी यांनी याप्रकरणी संशय व्यक्त केला होता की, मोहोळ यांचा भागीदारी असलेला विकासक या व्यवहारात सहभागी असू शकतो. मात्र, मोहोळ यांनी दस्तऐवज आणि पुरावे सादर करून आपली भूमिका स्पष्ट केली, त्यानंतर समाजाने त्यांच्या बाजूने भूमिका घेतली.
“गुरुदेवांनी मला आवाहन केले की आपण आमच्यासाठी येथे यावे आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा. मी प्रतिनिधी म्हणून हे आवाहन मान्य केले,” असे मोहोळ यांनी सांगितले…



