पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे (GBS) परिस्थिती धोकादायक, 2 रुग्णांचा मृत्यू 100 च्या पुढे रुग्ण हॉस्पिटल मधे दाखल….
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
दिवसेंदिवस पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराचा धोका वाढत असलेला दिसत आहे. या विकारामुळे शहरात दोन मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, रविवारपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे.
मागील आठवड्यात पुण्यात 24 संशयित प्रकरणांची प्राथमिक ओळख झाल्यानंतर, संक्रमणामध्ये अचानक वाढ झाल्याची तपासणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) स्थापन केली होती. या तपासणीनंतर जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे, ज्यात 68 पुरुष आणि 33 महिला अशा रुग्णांची ओळख पटली आहे. यापैकी 17 व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत.
महापालिका प्रशासनाने सिंहगड रस्ता, नांदेडगाव, आणि किरकटवाडी, धायरी DSK सोसायटी सारख्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, कारण या भागात GBS चे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या भागातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यावर जोर दिला जात आहे.
GBS रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात स्थिती गंभीर झाली आहे. महापालिका आणि राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. GBS चा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
स्थानिक डॉक्टर म्हणतात…
किरकटवाडीत DSK सोसायटी परिसरातील दवाखाना चालवणारे म्हणाले, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलाब, उलट्या, अशक्तपणा अशा तक्रारींचे रुग्ण जास्त प्रमाणात यायला सुरुवात झाली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज ५०-६० रुग्ण ओपीडीमध्ये येत होते. १०० पैकी १० लोकांना इन्फेक्शन झाल्याची शक्यता आहे. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. जीबीएसची लक्षणे दिसल्यास मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे (GBS) कारण-
ही एक जीवघेणी न्यूरोलॉजिकल स्थिती आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु तो सामान्यतः 30 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. तज्ञांच्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोमचेनेमके कारण माहित नाही, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बहुतेक प्रकरणे जंतुसंवेदनशील जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गानंतर होतात. परिणामी, शरीरावरच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे कॅम्पायलोबॅक्टेर जेज्युनी या जीवाणूचा संसर्ग, ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो. कधी कधी, काही लसीही गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या जोखमीचे कारण होऊ शकतात, पण हे अत्यंत दुर्मिळ आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे-
पायांमध्ये अशक्तपणा शरीरात थकवा येणे, चेहऱ्याच्या हालचालींमध्ये समस्या येणे, डोळे हलवण्यास त्रास होणे. वेदनेसह खाज सुटणे, लघवीवर नियंत्रण नसणे अर्धांगवायूमुळे पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. एक तृतीयांश प्रकरणांमध्ये श्वासोच्छवासावर परिणाम होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमुळे बोलणे आणि गिळणे प्रभावित होऊ शकते. गुंतागुंत वाढल्यास श्वसनक्रिया बंद पडणे किंवा हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.
पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे…



