सिंहगड रोडवर दहशत माजवणाऱ्या टोळीला बेड्या; धारदार हत्याराने हल्ला करणारे ४ आरोपी जेरबंद


पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा..

सिंहगड रोड परिसरात धारदार लोखंडी हत्यारांनी दोन इसमांवर जीवघेणा हल्ला करून तसेच कारच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा सिंहगड रोड पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना मोठा आळा बसला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.२० वाजता वडगाव बुडा येथील महालक्ष्मी मंदिरासमोर पीएमसी शाळेजवळ पाच ते सहा अनोळखी इसमांनी सफेद रंगाच्या सुझुकी फ्रॉन्क्स कारवर हल्ला केला. आरोपींनी कारच्या काचा फोडत कारमधील दोन व्यक्तींवर धारदार लोखंडी हत्यारांनी वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि परिसरात दहशत माजवली.
या घटनेप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ११८(२), ३२४(४), १८९(२), १८९(४), १९०, १९१ तसेच शस्त्र अधिनियम कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), ३७(३), १३५ व फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम २०१३ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत चार जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – अमन अंबीर झारेकरी (वय २२), निशांत राजेश राऊत (वय २४), सुमित अनिल माने (वय २२) व स्वप्निल चंद्रकांत गायकवाड (वय २०) अशी असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी व तीन धारदार लोखंडी हत्यारे जप्त केली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त संभाजी कदम आणि सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!