बालविवाहाविरोधात दांडेकर पूल चौकात जनजागृतीचा एल्गार; पथनाट्याद्वारे प्रभावी संदेश


पुणेशहर प्रतिनिधी :- गणेश तुम्मा… बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सामूहिक लढा उभारण्याची गरज असल्याचे मत सरकारी अभिवक्ता मा. रेणुका देशपांडे यांनी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, सिंहगड विधी महाविद्यालय आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दांडेकर पूल चौक येथे बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत प्रभावी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात सिंहगड विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम आणि कायदेशीर परिणाम याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मा. रेणुका देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “बालविवाह ही सामाजिक कुप्रथा असून ती पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. बालविवाह करणाऱ्यांवर तसेच त्यास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.”
मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास कुचेकर यांनी सांगितले की, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय वाटचालीत खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बालविवाह ही प्रथा बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि सन्मानाने जीवन जगण्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर होणारे परिणाम, अल्पवयीन मातृत्वाचे आरोग्यधोके तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासावर होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत बालविवाह करणे, लावणे किंवा त्याला सहाय्य करणे हा दंडनीय गुन्हा असल्याची जाणीव नागरिकांना करून देण्यात आली.
यावेळी संस्थेचे संचालक अण्णा जोगदंड, संजना करंजवाने, मुरलीधर मोहोळ, प्रकाश बोदडे, विधी सेवा प्राधिकरणाचे स्वयंसेवक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!