गायमुख चौकात रक्तरंजित हल्ला; आंबेगाव पोलिसांनी खुनी अवघ्या काही तासांत गजाआड..


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस..

प्रेमसंबंधाच्या रागातून तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी नांदेड येथून अटक करून कायद्याच्या जाळ्यात ओढले आहे. या कारवाईमुळे आंबेगाव पोलिसांच्या कौशल्यपूर्ण आणि वेगवान तपासाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता, आंबेगाव बुद्रुक येथील गुरुदत्त वॉशिंग सेंटर, गायमुख चौक येथे जावेद खादमियाँ पठाण (वय ३४) हे त्यांच्या नातेवाईकांसोबत काम करत असताना अचानक वादाला तोंड द्यावे लागले. जावेद यांच्या मैत्रिणीचा लहान भाऊ संदिप रंगराव भुरके व त्याचा मित्र वॉशिंग सेंटरवर आले. जावेद व आरोपीच्या बहिणीतील प्रेमसंबंधाचा राग मनात धरून दोघांनी जावेद यांच्याशी हुज्जत घातली.
वादाचे रूपांतर हिंसाचारात होताच आरोपींनी लोखंडी हत्याराने जावेद यांच्या डोक्यावर व हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले व घटनास्थळावरून पळ काढला. उपचारादरम्यान जावेद पठाण यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

Advertisement

या प्रकरणी फिर्यादी रोफ उस्मान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ३६५/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५), आर्म अ‍ॅक्ट ४(२५), मपोअधि कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान मयत व आरोपी हे भोकर, नांदेड येथील शेजारी असल्याची माहिती मिळताच, आरोपी मूळ गावी पसार झाल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ तपास पथक रवाना करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नांदेड शहर व भोकर परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवून आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
१) संदिप रंगराव भुरके (वय २५)
२) ओमप्रसाद उर्फ दत्ता गणेश किरकन (वय २०)
दोघेही रा. चिखलवाडी, प्रफुलनगर, ता. भोकर, जि. नांदेड अशी आहेत.
आंबेगाव पोलीस स्टेशन येथे सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले करीत असून, मा. न्यायालयाने आरोपींना दिनांक ०१ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) मा. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ श्री. मिलिंद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या धडाकेबाज कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोनि (गुन्हे) गजानन चोरमले, पोउनि मोहन कळमकर यांच्यासह पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!