भाजपच्या माजी आमदाराला लक्ष्य? घराबाहेर दोन गाड्यांची तोडफोड; हल्लेखोर पसार
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस..
पुणे : माजी राज्यमंत्री तथा भाजपचे माजी आमदार दिलीप कांबळे यांच्या दोन चारचाकी वाहनांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घोरपडी परिसरात घडली. कांबळे यांच्या घराबाहेरच हा प्रकार घडल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी आमदार दिलीप कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान ते कुटुंबीयांसह बाहेर गेले होते. ते घरी परतल्यानंतर घराबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या दोन वाहनांची तोडफोड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हल्लेखोरांनी दगड आणि बांबूच्या साहाय्याने वाहनांचे नुकसान केल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, कांबळे राहत असलेल्या परिसरातील तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायरही तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच, संबंधित सोसायटीमध्ये इतर वाहने असतानाही केवळ कांबळे यांच्या दोन वाहनांनाच लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेबाबत कांबळे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही यंत्रणांचे नुकसान करण्यात आल्याने पोलिस तपासात हल्लेखोरांची ओळख पटविणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.
“घरासमोर उभ्या असलेल्या माझ्या गाड्यांची तोडफोड म्हणजे माझ्यावर आणि माझ्या घरावर झालेला हल्ला आहे,” अशी प्रतिक्रिया दिलीप कांबळे यांनी दिली.
घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरील सिटाडेल एम्प्रेस सोसायटी परिसरात ही घटना घडली. कांबळे हे 2014 ते 2019 या कालावधीत 13व्या महाराष्ट्र विधानसभेत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजपचे आमदार होते.
भाजपच्या माजी आमदाराच्या घराबाहेरच दोन वाहनांची तोडफोड झाल्याने या घटनेमागे नेमका उद्देश काय होता, हल्लेखोर कोण होते आणि हा पूर्वनियोजित प्रकार होता का, याबाबत आता पोलिस तपासातून काय समोर येते याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

