जकराया साखर कारखान्याविरोधात रणशिंग! ७ ऑगस्टपासून विधानभवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन
सोलापूर प्रतिनिधी :- सतीशदादा कांबळे…
सोलापूर जिल्ह्यातील जकराया साखर कारखान्याच्या परिसरातील शेतजमिनींवर कारखान्यातील कथित प्रदूषित पाणी सोडून शेतजमिनी नापिक केल्या जात असून, विहिरी व बोअरवेलमधील पिण्याचे पाणीही दूषित होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित पेट्रोल पंपावर शासनाची फसवणूक करून सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात राज्य शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, साखर आयुक्त तसेच संबंधित विभागांकडे वारंवार पुराव्यासह तक्रारी करूनही संबंधित कारखान्यावर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप ग्राहक हक्क संघर्ष समितीने केला आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र विशेष समितीमार्फत सखोल चौकशी करून संबंधित संचालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ पासून पुणे येथील विधानभवनासमोरील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मिलिंद मधुकर राजहंस यांनी दिली.
या आंदोलनासाठी विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे परवानगी मिळावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले असून, यापूर्वी दि. ३० जून २०२६ रोजी विभागीय आयुक्त, विविध मंत्री आणि संबंधित प्रशासकीय विभागांना तक्रार निवेदन देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, संबंधित साखर कारखाना व पेट्रोल पंपाचे संचालक हे सोलापूर जिल्ह्यातील प्रभावशाली लोकप्रतिनिधी असल्यामुळे प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे आंदोलन शेकडो कार्यकर्ते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांच्या पाठिंब्याने करण्यात येणार असल्याचे राजहंस यांनी स्पष्ट केले. तसेच प्रशासनाने आंदोलनास आवश्यक परवानगी देऊन सहकार्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

