निवडणुकीआधी पुणे शहर विद्रुप! आयुक्तांचे आदेश केराच्या टोपलीत; भावी नगरसेवकांच्या अनधिकृत फ्लेक्सना अभय?
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस….
पुणे महानगरपालिकेच्या तब्बल सात ते आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका अखेर जाहीर होण्याच्या मार्गावर असताना, शहराच्या सौंदर्यावर घाला घालण्याचे काम मात्र जोरात सुरू आहे. १५ डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याचे संकेत असताना, भावी नगरसेवकांनी पुणे शहर अक्षरशः फ्लेक्समय करून टाकले आहे.
नववर्षातील पहिल्याच महिन्यात १४ किंवा १५ जानेवारी रोजी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, शहरातील आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार विविध कार्यक्रमांच्या नावाखाली नागरिकांना प्रलोभने दाखवत आहेत. मात्र, “मीच योग्य उमेदवार” असल्याचे सिद्ध करण्याच्या नादात शहराचे सौंदर्य विद्रुप करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे.
आयुक्तांचे आदेश, पण अंमलबजावणी शून्य!
अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिरात फलकांवर कारवाई करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट आदेश देत, अशा प्रकारांवर १० हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रत्यक्षात हे आदेश आकाशचिन्ह विभागाकडून केराची टोपली दाखवले जात असल्याचे चित्र सध्या पुणेकर पाहत आहेत.
आज पुणे, पेठ एरिया, धनकवडी, बिबवेवाडी, सारसबाग, पद्मावती, सिंहगड रोड आदी भागांतील प्रमुख चौक आणि रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत फ्लेक्सचा विळखा पडलेला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, परिसराच्या विद्रुपीकरणात भरच पडत आहे.
कारवाई कधी? नागरिकांचा सवाल…
अनधिकृत फ्लेक्सविरोधात वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “निवडून आल्यावर शहरासाठी काम करणार असल्याचे सांगणारे भावी नगरसेवक, आजच नियम धाब्यावर बसवत असतील तर उद्या त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, आकाशचिन्ह विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे आयुक्तांचे आदेश कागदावरच राहणार की प्रत्यक्षात कारवाई होणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
शहर विद्रुप करणाऱ्यांना मत द्यायचे का?
निवडणुकीच्या तोंडावर शहर विद्रुप करणाऱ्या अशा उमेदवारांना नागरिक निवडून देणार का, की नियम पाळणाऱ्या आणि शहराच्या सौंदर्याची जपणूक करणाऱ्यांनाच संधी देणार—हा प्रश्न आता पुणे शहरात ऐरणीवर आला आहे…



