पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं 12व्या 13 व्या शतकातील पुरातन भुयार सापडल्या अनेक पुरातन मुर्त्या …
पंढरपूर प्रतिनिधी :- पंढरपूरातील मंदिराच्या गाभाऱ्यासमोर सोळ खांबीजवळील हनुमान दरवाजापाशी एक दगड खचलेला आढळला. तो दगड काढून पहिला असता त्या ठिकाणी एक तळघरवजा खोली आढळली. या तळघराच्या निमित्तानं पुरातन काळातील काही माहिती आणि रहस्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम युद्धपातळीवर सुरू असून नुकतंच मंदिर समितीनं या मंदिराची सुरेख झलक सर्वांपुढे आणली. मंदिर संवर्धनाच्या या कामात नव्यानं करण्यात आलेली सर्व बांधकामं काढत मंदिर पुरातन स्थितीत पुन्हा सर्वांसमोर आणलं जात आहे.
अशातच आज मंदिर परिसरातील कानोपात्रा मंदिराजवळ अंतर्गत भुयार आढळून आले. सात ते आठ फूट खोलीचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत असून त्यामध्ये मूर्ती असण्याची शक्यता आहे. मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबतची माहिती दिली असून पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदीरात पोहोचले आहेत.
दरम्यान, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत. यासाठी सुमारे 800 ते 900 किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. विठ्ठल गर्भ गृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे. या बरोबरच मंदिरातील गरुड खांब, मेघडंबरी देखील चांदीने मडवली जाणार आहे.
यंदाची आषाढी किंबहुना इथून पुढं सर्वच दिवस या मंदिरात येऊन विठुरायाचं रुप न्याहाळणं एक खास अनुभूती देऊन जाणार आहे. कारण, जवळपास 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठलाच्या या सुरेख मंदिराचं मूळ स्वरुप नुकतंच समोर आलं आहे.



