“देशभर शस्त्रे पुरवणारे रॅकेट उध्वस्त! पुणे पोलिसांची मध्यप्रदेशात मेगा मोहीम, तब्ब्ल 50 भट्ट्या केल्या नष्ट “
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहर पोलीसांनी संघटित गुन्हेगारीविरुद्ध राबविलेल्या मोठ्या ऑपरेशनमध्ये आंतरराज्यीय अवैध शस्त्र पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले आहे. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मध्यप्रदेशातील उमरटी (तहसील लेघवा, जि. बडवाणी) येथे पहाटे धाड टाकत ३६ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई विमानतळ पो. स्टे. गु.र. नं. ५५८/२०२५ तसेच काळेपडळ, खं.वि.प.-१, खं.वि.प.-२ व गुन्हे शाखा युनिट–३ मधील विविध २१ जप्त अवैध अग्निशस्त्रांच्या तपासातून उघड झालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली.
कारवाई दरम्यान मोठे अनैतिक शस्त्रनिर्मिती जाळे उघड
तपासात असे निष्पन्न झाले की उमरटी परिसरात “उमरटी शिकलगार आर्म्स (USA)” या नावाखाली प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती करून महाराष्ट्रासह विविध राज्यात तस्करी केली जात होती.
छाप्यात….
३६ शस्त्रनिर्मितीमध्ये सहभागी संशयित ताब्यात
५० बेकायदेशीर भट्ट्या नष्ट
अग्निशस्त्रे तयार करण्याचे मोठ्या प्रमाणातील साहित्य जप्त
अत्याधुनिक पद्धतीने शस्त्र भरण्याचे उपकरणे जप्त
तांत्रिक पुरावे आणि चौकशीतून ही आंतरराज्यीय साखळी व्यवस्थित संघटितरित्या चालवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंतिम शस्त्रप्राप्तधारकांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. विशेष ऑपरेशनमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा वापर या मोहिमेत अधिकारी-अंमलदारांच्या सुरक्षिततेकरिता QRT टीम, आर्म-अॅम्युनिशन, मोबाईल सर्व्हेलन्स व्हेईकल्स, बुलेट-प्रूफ जॅकेट, तात्पुरते वायरलेस नेटवर्क तसेच बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही
ही मोठी कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-४ सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण तसेच सहा. पोलीस निरीक्षक नितीन नाईक, मदन काबळे, कल्याणी कासोदे आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने पुण्यापासून ५०० कि.मी.चा प्रवास करत ही यशस्वी कारवाई केली.



