सलूनच्या स्पर्धेतून पेटला वाद; बिबवेवाडीत २५ वर्षीय तरुणाची हत्या”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
बिबवेवाडी पोलीस स्टेशन परिसरात धक्कादायक घटना स्वतःचे सलून सुरू केल्याच्या रागातून तिघांनी मिळून २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी परिसरात उघडकीस आली आहे. ग्राहक पळविल्याच्या संशयातून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाले.
मृत तरुणाचे नाव मोहमद शमी फिरोज कुरेशी (वय २५) असे असून तो मूळचा प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होता. सध्या तो अप्पर जुना बसस्टॉप परिसरातील साई स्मार्ट हेअर सलून येथे वास्तव्यास होता.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत
रोहित संतोष भालचिमकर (२४, रा. घोलेनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे)
सौरभ रोहिदास चोरघे (२२, रा. निपाणे वस्ती, जांभुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे)
अनिकेत सतीश चव्हाटे (२७, रा. हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे)
यांना अटक केली आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत शमी हा आरोपी सौरभ चोरघे याच्या सलूनमध्ये गेली दोन वर्षे काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने “गावाला जातो” असे सांगून काम सोडले; मात्र गावाला न जाता त्याने स्वतःचे स्वतंत्र सलून सुरू केले.
दरम्यान, शमी हा पूर्वीच्या सलूनमधील ग्राहकांना आपल्या नव्या दुकानात बोलावत असल्याची माहिती चोरघेला मिळाली. याचाच राग मनात धरून आरोपी मित्रांसह १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास साई स्मार्ट हेअर सलून, तिरुपती भेळशेजारी, अप्पर जुना बसस्टॉप, बिबवेवाडी येथे गेले.
तेथे झालेल्या वादात तिघांनी शमीला खाली पाडून छाती व पोटावर जोरदार लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.
गुन्हा दाखल..
या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पोस्टे क्र. ३५/२०२६ अन्वये भा.न्या.सं.क. १०३ (१), ३ (५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचा भाऊ मोहम्मद सलमान फिरोज कुरेशी (१८) यांनी फिर्याद दिली आहे.
या कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
परिसरात तणाव..
घटनेनंतर बिबवेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गस्त वाढविली आहे. व्यवसायातील स्पर्धा आणि ग्राहकांवरील वादातून थेट खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.



