कात्रज हत्याकांडाला न्याय: पत्नीच्या खुनासाठी पतीला आजीवन कारावास”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
चारित्र्याच्या संशयातून घडलेल्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाचा कडक निर्णय; ११ वर्षांनी पीडितेला न्याय….
पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या कात्रज येथील गंगा ओशन सोसायटीतील पत्नीच्या खुनाच्या प्रकरणात अखेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी रामचंद्र सेहु चव्हाण यास आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुमित जोशी यांनी दिनांक ०५ मे २०२६ रोजी हा निर्णय दिला.
दिनांक ०९ ऑक्टोबर २०१५ रोजी घडलेल्या या घटनेत आरोपीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत अत्यंत क्रूर पद्धतीने तिचा खून केला होता. घटनेनंतर आरोपी संशयास्पद अवस्थेत कात्रज चौक परिसरात फिरताना नागरिक व पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर शिंदे यांनी काटेकोरपणे करत ठोस पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान फिर्यादीस न्याय मिळावा आणि आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्री. मिलिंद मोहिते यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रकरणात सरकारी वकील श्री. अग्रवाल यांनी प्रभावी बाजू मांडली.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, तसेच सहायक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकानेही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.
या निकालामुळे शहरात गंभीर गुन्ह्यांविरोधात कडक संदेश गेला असून न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे

