कोट्यवधींच्या संपत्तीचा खेळ? भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे…


पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा…

महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात उर्फ भोंदू बाबा प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, त्यांच्या कथित बेनामी संपत्तीबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. आयकर विभागाच्या (बेनामी प्रॉपर्टी) कक्षाकडे या प्रकरणाची तक्रार आनंद राजहंस यांनी दाखल केली असून, उत्पन्नाच्या मानाने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, KARMA Construction LLP या कंपनीचे संचालक आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांचा या व्यवहारात सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच Geeta Agro & Infrastructure Pvt. Ltd. आणि Multiventure Estates Private Limited या कंपन्यांमधील काही व्यवहारांवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कंपन्यांमध्ये पूर्वी काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, रायगड जिल्ह्यातील काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींनी पडद्यामागून आर्थिक व्यवहारात मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाळगंगा प्रकल्पातील जमीन खरेदी व्यवहार आणि कथित सिंचन घोटाळ्यातील निधीचा वापर करून काळा पैसा पांढरा करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी सांगितले की, या प्रकरणात केवळ अशोक खरात यांच्याच भूमिकेचा तपास न करता, त्यांच्या माध्यमातून कोण राजकीय किंवा आर्थिक फायदा घेत आहे का, तसेच ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार होत आहेत का, याचाही सखोल तपास करावा.
सुमारे सात महिन्यांपूर्वी बाळगंगा प्रकल्पातील जमीन खरेदी प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीवर सध्या चौकशी सुरू असून, कर्जत तालुक्यातील काही नेत्यांचाही तपास सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
तक्रारदारांनी सांगितले की, विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबा त्यांना मिळत असून, येत्या सहा ते सात दिवसांत पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे आणि माहिती जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.
दरम्यान, अशा प्रकारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त करत, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी करण्यात येत आहे….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!