मोबाईल-गाड्या चोरीचा पर्दाफाश! बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, ₹१.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
पुणे बिबवेवाडी परिसरात दुचाकी चोरीसह घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास अटक करून ₹१,८०,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सतर्क तपास, गुप्त बातमीदारांची अचूक माहिती आणि तत्पर कारवाईमुळे एकामागोमाग अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे.
दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी एका महिलेची मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नं. २४३/२०२५, भा.न्या.सं.क. ३०३(३) अंतर्गत गुन्हा दाखल होता.
बिबवेवाडी परिसरातील १६ एकर मैदानात सापळा, चोर जाळ्यात. तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष गायकवाड व विशाल जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, १६ एकर परिसरातील मोकळ्या मैदानात एक इसम चोरीची गाडी घेऊन संशयास्पदरीत्या थांबलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव बाळू प्रभाकर चव्हाण (वय ३८), रा. सदाशिव चाळ, कान्दा मार्केट, जुन्नर एस.टी. स्टॅन्ड समोर, पुणे असे सांगितले. तो पूर्वीपासून गुन्हेगारी नोंदी असलेला आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
जेजुरीत मोटारसायकल चोरी, बिबवेवाडीत घरफोडी
अधिक चौकशीत आरोपीने —
जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतून २ मोटारसायकल चोरी केल्याची,
१० मोबाईल फोन चोरल्याची,
तसेच बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २२३/२०२५ अंतर्गत घरफोडी केल्याची कबुली दिली.
या सर्व गुन्ह्यांचा तपास पुढे नेत आरोपीकडून एकूण ₹१,८०,०००/- किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांमुळे परिसरात निर्माण झालेली भीती दूर होण्यास मोठा दिलासा मिळाला आहे.
वरिष्ठांचा मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई Pune City Police यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



